आव्हानांना सामोरे जाताना स्वत:च एक आव्हान बना!
समोर आलेल्या कोणत्याही संकटाचा , आव्हानाचा जिद्दीने स्वीकार करणारा, त्याला सामोरे जाणारा स्वत:च एक आव्हान बनतो हि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
शत्रूने साम. दाम,दंड भेद आदी समस्त मार्गाचा अवलंब केला, तरी खड्या ध्येयनिष्ट, जिद्दी व्यक्तीला कोणीही पराभूत करू शकत नाही. जगभरातील सर्व महापुरुषांची चरित्रे पहिली तर त्यांच्यात एक समान वैशिष्ट्य आढळते, आव्हानांना सामोरे जाण्यात ते कधी कचरले नाहीत. महात्मा गांधीनी दक्षिणआफ्रिकेतरेल्वेच्या पहिल्या वर्गात डब्यातून प्रवास करण्याचा हक्क प्राप्त करण्यासाठी गोरया, वर्णद्वेषी सरकारला सामोरे जाण्याचे , त्याच्याशी संघर्ष करण्याचे आव्हान स्वीकारले नसते; तर त्यांना महात्मा, राष्ट्रपिता, बापू अशी बिरुदे प्राप्त झाली नसती.
आजच्या युवकांमधील सर्वात मोठी कमजोरी कोणती असेल तर ती ही की, कोणतेही आव्हान स्वीकारण्यात ते तयार नसतात. खर तर समोर आलेले आव्हान एक प्रेरणास्त्रोत असते. त्याच्याकडे पाठ फिरवणे, त्याला सामोरे न जाणे, त्याचा स्वीकार न करणे म्हणजे जीवनाकडे पाठ फिरवणे, जीवनाला सामोरे न जाणे, जीवनाचा स्वीकार न करण्यासारखे आहे. सिद्धांत व उपदेश हे प्रत्यक्ष आचरणात येतात तेव्हाच खरी शोभा देतात.
प्रकाश हा पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधत दीड वर्ष बेकार होता. एकदा तो घरी आपल्या पुतण्याला अभ्यास करण्यावरून रागावला, तेव्हा मोठाच गोंधळ झाला. सर्वजण त्यालाच टाकून बोलू लागले की, तू शिकून काय मोठे दिवे लावलेस; कुठे मोठा कलेक्टर बनलास; प्रकाशला ते शब्द जिव्हारी लागले. त्याने सिव्हिल सर्विसचा अभ्यास सुरु केला आणि जिद्दीने परीक्षा पास होऊन तो एक दिवस कलेक्टर बनला याला म्हणतात जिद्द, आव्हान स्वीकारणे . प्रयत्न केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. कठीण असेल, पण असाध्य नाही. पूर्वीच्या काळी एखादे कठीण काम करण्यासाठी शूरवीरांची सभा बोलावून मध्ये विडा ठेवला जाई.
एखादा पराक्रमी, जिद्दी योद्धा विडा उचलून आव्हान स्वीकारत असे व कार्यात यशस्वी होऊन येत असे. आजच्या काळातील नोकरीच्या जाहिराती एक प्रकारे पैजेच्या विड्यासारख्याच आहेत. तो विडा उचलून यश संपादले पाहिजे. आजच्या युवकांना एवढेच सांगणे आहे, की त्यांनी परिणामाची, हार जीतीची फारशी फिकीर न करता आपल्या परीक्षेलाही एक आव्हान म्हणून स्वीकारावे.एकदा प्रवाहात झेप घेतली की आपोआप पोहायला येते हा अनुभव आहे .