संभाषण मधुर व संतुलित राखण्यासाठी
आज व्यस्त जीवनात कोणाकडेही पूर्वीच्या लोकांप्रमाणे तास न तास गप्पा मारायला वेळ नसतो. आपण आपला थोडा वेळच शेजारी, नातलग, मित्र व परिचितांसोबत घालवू शकतो. त्यामुळे या कमी वेळेत आपल्याला भेटणारी व्यक्ती दुखावली जाणार नाही उलट जास्त आनंदी राहील असे आपण पाहायला हवे. त्यासाठी संभाषण मधुर व संतुलित राखायला हवे
१) संभाषण नेहमी सावकाश व मधुर शब्दात करावे. बोलताना समोरच्या माणसाच्या रुची व कार्यक्षेत्राचा विचार करावा. बोलताना शारीरिक हालचालींवर नियंत्रण ठेवावे. हात नाचवणे, डोळेमिचकावणे, टाळ्या देणे टाळावे .
२) समोरच्या व्यक्तीला बोलण्याची पुरेपूर संधी द्यावी. त्याचे बोलणे रस घेऊन ऐकावे. अभद्र, अर्वाच्य बोलू नये. संभाषणात दोनपेक्षा जास्त व्यक्ती असतील, तर प्रथम त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेऊन नंतरच बोलावे. त्यांचे बोलणे मध्येच तोडून स्वत: बोलणे उताविळपणा दर्शविते.
३) जर संभाषणात अनेकजण असतील, तर सर्वांसमोर कधीही एखाद्याला आपली प्रायव्हेट बाब सांगण्यासाठी कोपरयात नेऊ नये.
काही महिला एकमेकींच्या कानात कुजबूजत बोलतात वा खुणा करतात जे अशिष्ट दिसते. त्याचा इतरांवर वाईट परिणाम होतो व त्या आपली निंदा तर करीत नाही न असे वाटू लागते.
४) समोरच्या महिलेच्या कपड्यांकडे बारकाईने पाहणे वा त्याबद्दल चौकशी करणे योग्य नव्हे. कपड्यांवर नवे ठेवणे म्हणजे क्षुद्र मानसिकतेचे प्रदर्शन असते. जमले तर प्रशंसा अवश्य करावी.
५) प्रत्येकात काही न काही चांगला गुण असतो. संभाषणात त्याचा उल्लेख अवश्य करावा. इतरांचे गुण सहजतेने स्वीकारणे मोठेपणा दर्शवतो. संभाषणात एवढेही वाहून जाऊ नये की,सारे शिष्टाचार विसरले जातील. समोरच्याचे वय, पद इत्यादी लक्षात घेऊन बोलावे.
६) मुलांशी व किशोरवयींशी कधीही व्यावहारिक व घरातील गोष्टी बोलू नयेत. त्यांच्याशी अभ्यास, खेळ व मित्र- मैत्रिणी इत्यादी विषयी बोलावे. बोलताना वयाचे भान राखावे.
७) तरुण वर्गाशी बोलताना ते शिकत असल्यास करीअरबाबत बोलावे. जर मार्गदर्शन करण्यात सक्षम असाल, तर अवश्य मार्गदर्शन करावे. त्यांच्या अभ्यासाला उपयुक्त माहिती व साहित्य पाहिजे असल्यास त्यांना अवश्य द्यावे.
८) कोणत्याही समवयस्क व्यक्तींशी आपण मोकळेपणाने बोलू शकता. बोलताना आपल्या बोलण्यात अहंकार डोकावत नाही ना हे अवश्य पाहावे. घरातील नोकरांशी हुकमी स्वरात न बोलता आपुलकीने बोलावे. यामुळे आपण त्यांच्याकडून सचोटीने, निष्ठेने, प्रेमाने उत्तम काम करून घेऊ शकता. अधूनमधून घरच्यांशी चौकशी करावी. त्यांच्या सुख-दु:खाचा विचार करावा.
९) आत्मप्रौढी, आत्मस्तुती टाळावी. इतरांची चुगली, दोष दाखवणे यामुळे आपलीच प्रतिमा डागाळते. बोलण्याचा विषय ठरलेला असेल तर इतर सामान्य चर्चा करू नये.