नागीण या आजारावर घरगुती उपचार
नागीण या आजारावर घरगुती उपचार
नागीण या आजाराविषयी गैरसमज अधिक आहेत. नागिणीने विळखा मारला की, जिवाला धोका असतो, हा त्यापैकी मोठा गैरसमज. गैरसमज दूर करून योग्य काळजी घेतल्यास नागिणीचा प्रसार कमी करण्यात मदत होईल. उन्हाळा सुरू झाला की, वाढत्या तापमानाबरोबर विविध साथीचे आजार पसरायला सुरुवात होते. विविध विषाणूजन्य या ऋतूत जास्त प्रमाणात जाणवतात. लहान मुलांमध्ये होणाऱ्या कांजिण्या आणि त्याच विषाणूंमुळे होणारी नागीण हे आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्या विषयीचे गैरसमज दूर करून योग्य ती काळजी घेतल्यास त्याचा प्रसार कमी करण्यास मदत होऊ शकते. लहानपणी ज्या व्यक्तींना कांजिण्या होतात, त्या रुग्णांमध्ये हे विषाणू मज्जारज्जूमध्ये सूप्त रूपात कायम वास्तव्य करतात. एकदा कांजिण्या झाल्यावर पुन्हा होत नाहीत. काही कारणाने आपली प्रतिकारशक्ती कमी झाली तर हे सूप्त असलेले विषाणू परत जागृत होतात आणि त्या व्यक्तीला नागीण होते. प्रतिकार शक्ती कमी होण्याची अनेक कारणे आहेत. मधुमेह, प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधे (स्टिरॉइड्स, अवयवरोपणानंतर घ्यावी लागणारी औषधे, केमोथेरपीसाठी वापरली जाणारी औषधे इत्यादी.) एड्स या आजारात एकूणच शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार उद्भवू शकतो. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतरही काही वेळेला नागीण उद़्भवते. नागीण होण्याआधी काही वेळेला त्या भागामध्ये दुखायला लागते. त्वचा जास्त हुळहुळी होते आणि त्वचेची आग होते. या काळात पुरळ उठलेले नसल्याने रुग्णांची आणि काही वेळा डॉक्टरांची दिशाभूल होऊन विनाकारण तपासण्या केल्या जातात. हा त्रास छातीवर झाल्यास काही रुग्ण कार्डिओलॉजिस्टकडे जाऊन गरज नसताना खूप तपासण्या करून घेतात.नागिणीच्या दुखण्यात प्रचंड आग होते आणि ठराविक अंतराने चमका मारतात. दोन-तीन दिवसांनंतर लालसर रंगाचे पुरळ येते. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे फोट सुरुवातीला लालसर असतात. नंतर त्यात पाणी भरते. ज्या नसेवर हे फोड उमटतात, त्या ठिकाणी त्वचा लालसर होऊ शकते आणि फोडांचे समूह उठतात. दोन समूहांमधील त्वचा नेहमीसारखी असते. नागिणीने विळखा मारला किंवा दोन तोंडे एकमेकांना जुळली की, जिवाला धोका असतो असा आपल्याकडे गैरसमज आहे. या गोष्टीत काहीही तथ्य नाही. कारण नागीण ही शक्यतो शरीराच्या एकाच बाजूला येते. आजाराची तीव्रता प्रत्येक पेशंटच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. काही वेळेला एकाच नसेला हा आजार होतो. इतर वेळेस दोन-तीन किंवा अधिक नसांना याची लागण होऊ शकते. वेळेवर योग्य उपचार सुरू केल्यास याचा त्रास लवकर कमी होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होतो. पहिल्या ४८ तासांच्या आत वैद्यकीय उपचार सुरू झाल्यास पाच-सात दिवसांत खपल्या येऊन आजार व्यवस्थित आटोक्यात येऊ शकतो. नागीण बरी झाल्यावरसुद्धा काही व्यक्तींना त्या नसेच्या क्षेत्रात चमक मारणं, दुखणं असा त्रास होतो. पहिल्या ४८ तासांत उपचार सुरू झाले तर हे टाळता येऊ शकते. नागिणीवर औषध नाही, असा गैरसमज असल्यामुळे बऱ्याच वेळा रुग्ण इतर उपचार करू लागतो. घरच्या घरी दुर्वा, जळलेले खोबरे अधवा तांदूळ वाटून त्याचा लेप लावण्यात येतो. यामुळे आजार बरा होण्याऐवजी जखम चिघळून ते जास्त पसरतं आणि दुखणं लांबत जाते. नागीण झाल्याचे लक्षात आल्यास त्वचारोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करून घ्यावेत. याच्या गोळ्या पूर्ण डोसमध्ये घेणं अतिशय गरजेचं असतं. रुग्ण दुष्परिणाम होतील या भीतीने मनानेच अर्धवट मात्रा घेतात. तसं करणं योग्य नसतं. या आजारावरचे औषध गरोदरपणातही देता येतं. याचे दुष्परिणाम नसल्यासारखेच आहेत. आजार झाला असताना जास्त दगदग टाळावी, हलका आहार घ्यावा. अंघोळीनंतर ती जागा टिपून घ्यावी. स्वतःचे कपडे, साबण वेगळं ठेवावं.
हे ही वाचा : Marathi Love Quotes