देशात डिजिलॉकर होणार वन स्टॉप सोल्यूशन; तुम्हाला आता कागदपत्र जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही..

भारत

मोदी सरकारचे आज ९ वे तसेच २०२४ च्या लोकसभेआधीचा हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडला. आज मांडलेल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डिजिलॉकर संबंधित एक महत्त्वाची घोषणा केली आहे. डिजिलॉकर (DigiLocker) ही आता आपल्यासाठी वन स्टॉप KYC प्रणाली ठरणार असून त्यामुळे आपल्या डॉक्युमेंट्समध्ये हवे ते बदल करता येऊ शकणार आहेत. डिजिलॉकरशी संबंधित उचललेल्या या पावलामुळे डिजिटल इंडियाच्या धोरणाचा मोठी चालना मिळणार आहे.

डिजिलॉकर आणि आधारचा वापर वन-स्टॉप सोल्युशन म्हणून केला जाईल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज त्यांच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, केवायसी(KYC) आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिजिलॉकर(Digi Locker) आणि आधारचा (UIDAI) वापर वन-स्टॉप सोल्युशन म्हणून केला जाईल. यासोबतच डिजिलॉकरसाठी वन स्टॉप केवायसी व्यवस्थापन प्रणाली तयार केली जाईल. त्यासाठी पॅन कार्डचा अधिकृत ओळखपत्र म्हणून वापर करता येणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.

डिजिलॉकर आता व्यक्तींसाठी वन-स्टॉप केवायसी प्रणाली राहील

अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, डिजिलॉकर आता व्यक्तींसाठी वन-स्टॉप केवायसी देखभाल प्रणाली असेल, त्यामुळे तुम्हाला कागदपत्रांमध्ये बदल करता येतील आणि ते तुमच्या डिजिलॉकरशी लिंक केलेल्या सर्व दस्तऐवजांमध्ये दिसून येतील. डिजिलॉकर सेवा आणि आधार यांचा ओळखपत्र म्हणून वापर केला जाणार आहे. विविध सरकारी एजन्सी, नियामक आणि नियमन केलेल्या संस्थांद्वारे देखरेख केलेल्या व्यक्तींची ओळख आणि पत्ते जुळण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी वन-स्टॉप सोल्यूशन सेट केले जाईल.

भारताला डिजिटली एम्पॉवर करण्याचा आणि नॉलेज इकॉनॉमीमध्ये बदलण्याचा उद्देश

केंद्र सरकारचा डिजिलॉकर हा डिजिटल इंडिया अंतर्गत एक महत्वाचा उपक्रम आणि प्रमुख कार्यक्रम आहे. त्याचा उद्देश भारताला डिजिटली एम्पॉवर करण्याचा आणि नॉलेज इकॉनॉमीमध्ये बदलण्याचा आहे. डिजिलॉकर नागरिकांना सार्वजनिक क्लाउडवर सुरक्षित डॉक्युमेंटेशन करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.

तुमच्या कागदपत्रांची हार्ड कॉपी जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही

डिजिलॉकर या सुविधेच्या मदतीने आपल्याला ऑनलाइन क्लाउड सेवा मिळते. त्यामुळे आपल्याला कागदपत्रांची हार्ड कॉपी जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. या अँपमध्ये आपण आधारपासून, ड्रायव्हिंग लायसन्स आणि मार्कशीटपर्यंत इतर सर्व कागदपत्रं सेव्ह करु शकतो. हे डिजिटल दस्तऐवज भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कायदेशीररित्या वैध दस्तऐवज आहेत.

डिजिलॉकर वापरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक लागतात

डिजिलॉकर वापरण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या प्रमाणपत्राची प्रत स्कॅन करून त्यांच्या ई-स्वाक्षरीसह डिजिलॉकर अँपवर अपलोड करणे आवश्यक आहे. ई-स्वाक्षरी हे स्वयं-प्रमाणित कागदपत्रांसारखे आहे.

केंद्र सरकार सध्या डिजिटल इंडियासाठी डिजिलॉकर आणि ऑनलाइन डॉक्युमेंटेशनला जास्त प्रोत्साहन देताना दिसत आहे. अशा स्थितीत येणाऱ्या काळात फोनमध्ये डिजिलॉकर अँप आधीच इन्स्टॉल केले जाणार आहे. म्हणजेच ते गुगल प्ले स्टोअरवरून स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. डिजिलॉकर अँप मुळे सर्व कागदपत्रे तुमची सुरक्षित राहतील आणि तुम्हाला मूळ कागदपत्रे सोबत घेण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे भविष्यात डिजिलॉकर हि सुविधा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, नोकरदार वर्गासाठी, व्यापारी सर्वांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे.