आज वैशाख शुक्लपक्ष तृतीया अक्षय्य तृतीया; या दिवशी पूजा कशी करावी, काय दान करावे वाचा सविस्तर

शास्त्र

अक्षय तृतीया म्हणजे काय

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात.

अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या घटना घडल्या

श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी भगवान परशुराम, नरनारायण व हयग्रीव हे अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले. याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम – मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते. श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही‌. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.

akshaya tritiya

अक्षय्य तृतीया पूजा कशी करावी?

या दिवशी सकाळी स्नान करुन नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरभर्‍याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जवस गहु, हरबरे , सातु, दहीभात, उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ, धान्य पदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे.

अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठी महत्वाचा

अक्षय्यतृतीयेच्या दिवशी पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान, हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास जमले नाही तर निदान तिलतर्पण तरी करावे.

उन्हापासून रक्षण करणार्‍या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्रागौरीचे विसर्जन या दिवशी केले जाते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात.

अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे?

अक्षय्य तृतीया दिवशी नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. थोडक्यात काय तर कोणतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते. तसेच, नवीन जागा, संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना, उद्‌घाटन वगैरेही केली जातात. तसेच दिलेले दान अगर केलेला जप, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यामध्ये सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. नवीन वाहन खरेदी केले जाते.

🕉अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे?

या तिथीस दान आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो.

या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते.)

या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )

या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.

या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.

या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.

ll ओम नमो भगवते वासुदेवाय ll

ll सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ll

भृगुदेव कुलं भानुं, सहस्रबाहुर्मर्दनम्।
रेणुका नयनानंदं, परशुं वन्दे विप्रधनम्।।

ll ओम रां रां परशुरामाय सर्व सिद्धी प्रदाय नम: ll

या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.

हे हि वाचा : केरळमध्ये मोठी दुर्घटना, प्रवासी बोट उलटली, २१ जणांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत

Follow Us on Facebook